रामजन्मभूमी वादप्रकरणी हिंदू पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद

नवी दिल्ली : विजेत्या सम्राट बाबराने भगवान रामाच्या अयोध्येतील जन्मस्थानी मशीद बांधून केलेली चूक आता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी राम जन्मभूमी-  बाबरीमशीद वादावर बाजू मांडताना सांगितले. अयोध्या प्रकरणी सुनावणीचा  मंगळवारी ३९ वा दिवस होता, उद्या (बुधवार) चाळिसाव्या दिवशी त्याची समाप्ती होणार आहे.

हिंदू पक्षाची बाजू माजी महाधिवक्ता व वरिष्ठ  वकील के.पराशरन यांनी मांडली.  त्यांनी सांगितले की,  ‘अयोध्येत अनेक मशिदी आहेत  तेथे मुस्लिम लोक नमाज अदा करू शकतात, पण हिंदू रामाचे जन्मस्थान बदलू शकत नाहीत.’

पराशरन यांनी महंमत सुरेश दास यांच्या वतीने सांगितले की, ‘बाबराने भारतावर विजय मिळवला व नंतर कायद्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजून भगवान रामाच्या जन्मस्थळी मशीद बांधली ही त्याची चूक होती.’  न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस.ए. नझीर यांनी पराशरन यांना प्रश्न विचारले. मुस्लिमांच्या मते एकदा जिथे मशीद होती तिथे मशीदच राहू शकते या त्यांच्या विधानास तुमचा पाठिंबा आहे का, असे न्यायालयाने विचारले असता पराशरन यांनी, एकदा जिथे मंदिर होते तिथे मंदिरच राहू शकते असे स्पष्ट केले. मशीद पाडली गेली असली तरी मुस्लिम त्या जागेवर दावा सांगू शकतात, असा मुस्लिमांचा युक्तिवाद आहे.