रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता लागणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निकाल २०१०मध्ये अलाहाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानुसार, रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात या जमिनीचे वाटप करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एकूण १४ आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने न्या. एफ. एम. खलिफुल्ला, श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांच्छू यांची समिती नेमून अयोध्या प्रकरणाचा वाद सामोपचाराने मिटवण्यास परवानगी दिली होती, मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने सलग सुनावणी घेऊन खटल्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही रामजन्मभूमी असल्याने सर्व जमिनीचा ताबा देण्याची मागणी खटल्याशी संबंधित हिंदू याचिकाकर्त्यांनी केली होती. त्या मागणीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता.

सुरक्षा आढाव्यानंतरच  निकाल दिवस निश्चित

अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा  संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवार निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती. दिल्लीसह देशभर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शांततेचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे शनिवार ते सोमवार बंद हिंदू, मुस्लीम संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शांतता राखण्याचे आवाहन सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना सलग ४०  दिवस सुनावणी  दिल्लीसह देशभर दक्षतेचा इशारा