मनिका/ लोहारडग्गा : अयोध्या मुद्दय़ाबाबत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप करून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अयोध्येचा मुद्दा मांडला.

आपली मतपेढी सुरक्षित राखण्याच्या ‘लालसेपोटी’ काँग्रेसने काश्मीरची समस्या ७० वर्षे चिघळत ठेवली, असाही आरोप शहा यांनी केला. अयोध्येच्या मुद्दय़ावर अनेक वर्षे निकाल लागत नव्हता. आम्हालाही या वादाबाबत घटनेच्या चौकटीत तोडगा हवा होता. आता बघा, श्रीरामाच्या आशीर्वादाने सर्वोच्च न्यायालयाने भव्य राममंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केला आहे, असे शहा म्हणाले.

प्रत्येकाला अयोध्येत राममंदिर हवे होते, पण काँग्रेस हे प्रकरण रखडवत होती, असे शहा यांनी झारखंडमधील मनिका व लोहारडग्गा येथे निवडणूक प्रचारसभेतील भाषणात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतमातेच्या मुकुटावरील अनुच्छेद ३७०चा ठपका पुसून काढला आणि काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला, असेही शहा म्हणाले.

दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत मिळवल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारने अनुच्छेद ३७० आणि ३५अ हटवले, असे सांगून आपला पक्ष या मुद्दय़ाला देत असलेले महत्त्व शहा यांनी अधोरेखित केले.