सर्वोच्च न्यायालय आज निर्णय घेणार

अनंतकृष्णन जी./ एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

अयोध्या प्रश्नावर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय मध्यस्थ समितीने गुरुवारी आपला अहवाल न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे सादर केला.

अहवालाचा आढावा घेतल्यानंतर या प्रश्नावर मध्यस्थीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवायचे की त्याविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकांवर दररोज सुनावणी घ्यावयाची याचा निर्णय शुक्रवारी पाच सदस्यांचे घटनापीठ घेणार आहे. रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीस एफएमआय खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील मध्यस्थी समितीला १ ऑगस्टपर्यंत प्रगती अहवाल सादर करण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सांगितले होते.