देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आलं.

“संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीं आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असं मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केलं. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली,” असंही ते म्हणाले.

सध्या जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत करोनावरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनिल हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.