बद्रीनाथमधील हवामान पुन्हा एकदा खराब झाल्यामुळे तेथील बचावकार्य गुरुवारी थांबविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून येथील हवामान खराब असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. गुरुवारी सकाळी हवामान चांगले असल्यामुळे बद्रीनाथमधील बचावकार्य सुरू करण्यात आले होते. तेथे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर्स रवाना झाली होती. मात्र काही वेळाने पुन्हा एकदा हवामानाचा नूर पालटल्याने बचावकार्य थांबविण्यात आले.
दरम्यान, रोगराई पसरण्याची भीती असल्याने केदारनाथमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झालीये. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून अंत्यविधीसाठी लागणाऱया वस्तू केदारनाथला पाठविण्यात येत असून, तिथे सापडलेल्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात येत आहेत. उत्तराखंडमधील आरोग्य विभागाने केदारनाथ आणि आसपासच्या गावातील नागरिकांना नदीचे पाणी न पिण्याचे आवाहन केले आहे. महाप्रलय आणि मोठ्या प्रमाणातील जीवितहानी यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले असून, ते पिण्यास योग्य नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. केदारनाथ परिसरातील हवेमध्येही सध्या दुर्गंध असून, लवकरात लवकर सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले नाहीत, तर संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली.