उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील एक बीएससीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक विनंती केली आहे. या तरुणाने मुख्यमंत्र्यांना उद्देशून तयार केलेल्या एका व्हिडीओमध्ये हात जोडून मी तुम्हाला माझी पत्नी शोधून देण्याची विनंती करतो असं म्हटलं आहे. या तरुणाने उच्च जातीमधील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर आपल्या पत्नीला तिच्या सासरचे लोकं उचलून घेऊन गेल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. तेव्हापासून हा तरुण पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असला तरी तिच्याशी त्याचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळेच माझ्या पत्नीची हत्या झाल्याची मला शंका आहे असंही या तरुणाचं म्हणणं असून या प्रकरणामध्ये सरकारने लक्ष घालावं अशी मागणी त्याने केली आहे. इतकचं नाही तर मुलीचे नातेवाईक आपलीही हत्या करु शकतील अशी भीती त्याने बोलून दाखवली आहे.

आपल्या पत्नीशी संपर्क करण्याचा तिला शोधण्याचा प्रयत्न करुन थकलेल्या या तरुणाने योगी आदित्यनाथ यांना हात जोडून विनंती केली आहे. या तरुणाने मुलीबरोबर लग्न झाल्यानंतरचा तिचा एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. ज्यामुळे या तरुणीने आपल्या जीवाला नातेवाईकांकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. हे दोघेही बागपतमधील मुकुंदपुर ओवटी गावातील रहीवाशी आहेत. मुलाचं नाव कुलदीप असून मुलीचं नाव प्रिया आहे. दोघेही एकाच गावातील राहणारे असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी दोघांनीही घरातून पळून जाऊन नोंदणी पद्धीतने लग्न केलं. दोघेही एकत्रच राहत होते. त्यानंतर या मुलीच्या नातेवाईक तिला घेऊन गेल्याचा आरोप कुलदीपने केला आहे. नातेवाईक आपल्या पत्नीला घेऊन गेल्यापासून तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही असं कुलदीप सांगत असल्याचे न्यूज १८ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आणखी वाचा- भाजपाच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास

पत्नीचा शोध घेऊन थकलेल्या कुलदीपने आता आपल्या पत्नीला सरकारनेच शोधून द्यावे अशी विनंती केली आहे. पोलीसही आपलं काहीच ऐकून घेत नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. त्यामुळे आपल्याला कोणीच वाली उरला नसून काय करावे कुठे जावं?, पत्नीचा शोध कसा घ्यावा हे काहीच समजत नसल्याचं कुलदीपनं म्हटलं आहे. मी खालच्या जातीचा असून पत्नी ही उच्च जातीमधील असल्याने तिच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याचा दावा कुलदीपनं केला आहे. तसेच कदाचित माझ्या पत्नीची हत्याही करण्यात आली असावी अशी भीतीही त्याने व्यक्त केली असून याच भीतीपोटी त्याने थेट मुख्यमंत्र्यांची मदत मागितली आहे.