भारताकडून बालाकोटसारखी कारवाईची भिती आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पाकिस्तानने मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्या भूमीवरील दहशतवादी तळ बंद केले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरु असल्याचे पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले. भारताने अशा प्रकारे दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

मुझफ्फराबाद आणि कोटलीमध्ये प्रत्येकी पाच आणि बर्नालामध्ये एक असे ११ दहशतवादी तळ पीओकेमध्ये सुरु असल्याचे पुरावे भारताने सादर केले. सुंदरबनी आणि राजौरीच्या विरुद्ध दिशेला कोटली, निकियल भागात सुरु असलेले दहशतवादी तळ बंद झाले आहेत. लष्कर-ए-तय्यबाकडून हे तळ चालवले जात होते. पाला आणि बाघ भागात जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जाणारे तळही बंद झाले आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार मुझफ्फराबाद आणि मीरपूरजवळ असलेले दहशतवादी तळही बंद झाले आहेत. लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे हे तळ तात्पुरते बंद झाले आहेत. एलओसीजवळ असलेले दहशतवाद्याचे लाँचपॅडही बंद झाले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी या लाँचपॅडचा वापर होतो. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पीओकेमधून घुसखोरीचा प्रयत्न झालेला नाही. पाकिस्तानने सीमेवरील तणावही कमी करण्याची विनंती केली आहे.