पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या सहानुभूतीनंतर बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी चळवळीच्या नेत्यांना हुरूप आला असून त्यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांकडेही मदत मागितली आहे.

धार्मिक दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होणार आहेत हे जगाने समजून घेतले पाहिजे. दहशतवादावर नियंत्रण ठेवता नाही तर त्याचा परिणामकारकरीत्या बंदोबस्त केला पाहिजे, असे बलुच नॅशनल मूव्हमेंटचे अध्यक्ष खलिल बलुच यांनी म्हटले.

भारतीय पंतप्रधानांचे बलुचिस्तानबाबतचे वक्तव्य उत्साहवर्धक आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी नरेंद्र मोदींना साथ देऊन पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेली ६८ वर्षे करीत असलेल्या अत्याचारांना जागतिक स्तरावर वाचा फोडली पाहिजे, असे खलिल यांनी सांगितले.

बलुच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष ब्राहमदाग बुगती यांनी भारतीय नेते, प्रसारमाध्यमे आणि जनता बलुचिस्तानच्या लढय़ाला केवळ नैतिक नव्हे तर प्रत्यक्ष पाठिंबाही देईल, अशी आशा व्यक्त केली.