आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रन्ट ऑफ आसाम(उल्फा) या अतिरेकी संघटनेचा नेता अनूप चेतिया याला बांगलादेश सरकारने भारताच्या स्वाधीन केले आहे.

बांगलादेशने अनूप चेतिया याला १९९७ साली अवैध पासपोर्ट वापरून घुसखोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याजवळून शस्त्रास्त्रे आणि परकीय चलनही ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या अठरा वर्षांपासून तो बांगलादेशच्या कारागृहात होता. खून, खंडणी आणि अपहरण अशा अनेक गुन्ह्यांत भारताला हवा असलेला अनूप चेतिया याला अखेर मंगळवारी रात्री दोन वाजता बांगलादेशने भारताच्या स्वाधीन केले. सीबीआयने चेतिया याला ताब्यात घेतले आहे.

उल्फा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेचा चेतिया हा महासचिव आहे. त्याच्यावर आसाममध्ये पोलिसांची हत्या, अपहरण, बनावट नोटांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. भारतातही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.