अमेरिकेतील अनेक दिग्गज व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे. यात अमेरिकन नेते जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलच्या आणखी काही महत्त्वाच्या खात्यांचाही त्यात समावेश आहे. ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर त्यावर एक खास मेसेज पोस्ट करण्यात आला होता. तर दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचंही ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं होतं. हे संदेश क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केले गेले असल्याचं या संदेशांवरून दिसत आहे. दरम्यान, हे संदेश टाकल्यानंतर काही वेळानं ते डिलीटही करण्यात आले.

हॅकरनं त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या लिंकमध्ये बिट कॉईनच्या व्यवहारांची एक लिंकही टाकली होती. तसंच तुम्ही आम्हाला ५ हजार बिट कॉईन्स देणार आहात, असंही त्यात नमूद केलं होतं. माहिती मिळाल्यानंतर वेबसाईटनं ते डॉमेन रद्द केलं. अॅमेझॉनचे सह संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांची ट्विटर खाती हॅक केल्यानंतर त्यावरही असेच संदेश लिहिण्यात आले होते.


“आम्ही तुम्हाला काही देऊ इच्छीतो. तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. तुम्ही जेवढ्याही बिटकॉईन पाठवाल त्या दुप्पट करून आम्ही तुम्हाला परत पाठवू. हे केवळ ३० मिनिटांसाठीच आहे.” असं अॅपलच्या अकाऊंटवरून लिहिण्यात आलं होतं. “कोविड १९ मुळे लोकांना मी बिटकॉईन दुप्पट करून देत आहे. हे सर्व सुरक्षित आहे,” असं अॅलन मस्क यांच्या प्रोफाईलवरून लिहिण्यात आलं होतं. अमेरिकेतील राजकारणाशी निगडीत व्यक्तींचे ट्विटर हँडलही हॅक करून अशा प्रकारचे संदेश लिहिण्यात आले होते. यामध्ये ओबामा आणि जो बिडन यांचंही नाव सामिल आहे.

काही वेळानं अनेक कंपन्यांच्या ट्विटर हँडलवरूनही अशा प्रकारचे संदेश पाठवल्याचं दिसून आलं. यामध्ये अॅपल, उबेर आणि अन्य काही कंपन्यांच्या ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यानंतर काही वेळानं ट्विटरनं एक ट्विट करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहितीही दिली.