बँकेने नेट बँकिंगची सेवा दिली नाही त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने बँकेतील सीपीयू चोरल्याचा विचित्र घटना गुजरामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे सीपीयूची चोरी करणारा व्यक्ती हा ज्वेलर्स आहे. अहमदाबादमधील मकारबा शाखेमधील सीपीयू या ग्राहकाने चोरला आहे. बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकांनी यासंदर्भात आनंदनगर पोलीस स्थानकामध्ये रितसर तक्रार नोंदवली असून हा सर्व प्रकार बुधवारी घडल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. प्रल्हादनगरमध्ये ज्वेलर्सचे दुकान चालवणाऱ्या बँकेच्या ग्राहकाने बँकेच्या मालकीचा सीपीयू चोरल्याचा आरोप व्यवस्थापकांनी केला आहे. तक्रार करणाऱ्या व्यवस्थापकाचे नाव विनीत गुरुदत्त असे असून त्याने बँकेच्या वतीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

“एस.पी. ज्वेलर्सचे मालक संजय शाह हे बुधवारी संध्याकाळी बँकेत आले आणि बँकेतील कर्मचाऱ्यांवर ओरडू लागले. त्यावेळी मी त्यांना शांत होण्याचा विनंती करुन त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला,” असं गुरुदत्त यांचे म्हणणे नाही. ‘नेट बँकिंगची सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील विनंती करणारा एक ई-मेल मी बँकेला काही दिवसांपूर्वीच केला होता. मात्र या ई-मेलवर मला काहीही उत्तर आलं नाही,’ असं शाह यांनी गुरुदत्त यांना सांगितलं. गुरुदत्त यांनी यासंदर्भात चौकशी करुन आधीपासूनच तुमच्या खात्याला नेट बँकिंगची सुविधा देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती शाह यांना दिली.

नेट बँकिंगसंदर्भातील गोंधळ पाहून शाह चांगलेच संतापले आणि त्यांनी बँकेत आरडाओरड सुरु केला. मला १५ मिनिटांच्या आत नेट बँकिंगची सेवा दिली नाही तर मी बँकेतील एक सीपीयू घेऊन जाईल अशी धमकीही शाह यांनी दिल्याचे पोलिसांकडे तक्रारीमध्ये गुरुदत्त यांनी म्हटलं आहे. आपण बँकेच्या आयटी विभागाशी बोलून तुमचे नेट बँकिंग लवकरात लवकर सुरु करु असं आश्वासन गुरुदत्त यांनी शाह यांना दिलं. त्यानंतर गुरुदत्त हे आयटीमधील काही कर्मचाऱ्यांशी शाह यांच्या खात्यासंदर्भात बोलत असतानाच शाह यांनी बँकेतील एका कंप्युटरचा सीपीयू काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी बँकेतील कर्मचारी रुची पटेल आणि राहुल कुमार यांनी शाह यांना विरोध केला. मात्र शाह यांनी त्यांचे काहीच ऐकून न घेता बँकेच्या ग्राहकांची महत्वाची माहिती असणारा सीपीयू काढून घेतला.

याबद्दल गुरुदत्त यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. काही तासांनी शाह हे बँकेत सीपीयू घेऊन परत आले आणि तो बँकेत ठेवून निघून गेले. या प्रकरणात आनंदनगर पोलीस ठाण्यातील निरिक्षक एस. जे बलुच यांनी दिलेल्या माहितीनुसार शाह यांनी करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा निकाल आल्यानंतर त्यांच्या अटकेसंदर्भातील पुढील कारवाई करण्यात येणार आहे.