अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आता राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. पण याच ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटॉर्नी जनरल पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्या फेरनिवडणूक प्रचार अभियानाला ६ हजार डॉलर्सची देणगी दिली होती.

सप्टेंबर २०११ मध्ये ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेला ५ हजार डॉलर्स आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये एक हजार डॉलर्सची देणगी दिली होती. कॅम्पेन-फायनान्स रेकॉर्डमधून ही माहिती समोर आली आहे. रेकॉर्डनुसार, ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांनी २०१४ साली हॅरिस यांच्या कॅम्पेनला दोन हजार डॉलर्सची देणगी दिली होती. द वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त दिले आहे.

२०१५ साली ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रचार सुरु केला. सिनेटवर जाण्याआधी कमला हॅरिस यांनी २०११ ते २०१६ दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाकडून कॅलिफोर्नियाचे अ‍ॅटॉर्नी जनरलपद भूषवले आहे. २०१६ सालच्या सिनेट निवडणुकीत ट्रम्प यांच्याकडून देणगी घेतल्याच्या मुद्दावरुन प्रतिस्पर्धी उमेदवार लॉरेट्टा सांचेझ यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
कमला हॅरिस यांच्या कार्यालयाने ट्रम्प विद्यापीठाची चौकशी केली होती. पण शाळेवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. ट्रम्प यांनी हॅरिस यांना देणगी दिली, पण त्याआधीच ट्रम्प विद्यापीठाने वर्ग बंद केले होते. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा ट्रम्प विद्यापीठावर आरोप होता.

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारे जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असणाऱ्या कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई तामिळ आहे. अमेरिकेत यावर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.