भाषण देऊन परतणाऱ्या एका युवा काँग्रेस नेत्याची जीभ कापण्यात आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप होतो आहे. छत्तीसगडच्या बेमतरा जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार रविंद्र चौबे यांच्या समर्थनार्थ राहुल दानी या युवा नेत्याने भाषण दिले. हे भाषण दिल्यावर राहुल दानी परतत होता. त्यावेळी त्याच्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटण्यात आली. या घटनेनंतर राहुल दानीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे. या ठिकाणी त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली आहे. या हल्ल्याचा राहुल दानीवर एवढा परिणाम झाला की तो कोमामध्ये गेला.

राहुल दानीची जीभ कापली गेल्याची घटना ३१ ऑक्टोबरला घडल्याचे समजते आहे. राहुल दानी भाषण करून परतत होता. त्यानंतर तो एका ढाब्यावर जेवणासाठी थांबला. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानतंर त्याची जीभ कापण्यात आली. ज्यानंतर त्याला रस्त्याच्या एका कडेला टाकून हल्लेखोर पळाले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी राहुलची अवस्था पाहिली त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अज्ञात हल्लेखोरांनी आपल्याला जबर मारहाण केली आणि मरणासन्न अवस्थेत सोडून पळून गेले. तीन दिवस कोमामध्ये राहिल्यावर राहुलला शुद्ध आली. तुला भाषण देण्याची जास्त हौस आहे आता तुझी जीभच कापतो असे हल्लेखोर ओरडत होते असेही राहुलने सांगितले आहे. या हल्ल्यात राहुलच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. न्यूज १८ लोकमतने या संदर्भातले वृत्त दिले आहे.