दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुभद्रा मुखर्जी यांनी हिंसाचाराचा निषेध करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सुभद्रा मुखर्जी यांनी २०१३ मध्ये भाजपा पक्षात प्रवेश केला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्याकडे आपण राजीनामा पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आपल्या निर्णयासंबंधी बोलताना सुभद्रा मुखर्जी यांनी सांगितलं की, “भाजपा पक्षाचं कामकाज ज्या पद्दतीने सुरु आहे त्यापासून प्रभावित होत मी २०१३ मध्ये पक्षात प्रवेश केला होता. पण गेल्या काही वर्षात गोष्टी योग्य पद्धतीने सुरु नसल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. भाजपाच्या विचारसणीची जागा आता द्वेष आणि धर्माच्या आधारे लोकांबद्दल मत निर्माण करणं यांनी घेतली आहे. खूप विचार केल्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे”.

“दिल्लीत काय झालं हे तुम्ही सर्वांना पाहिलं आहे. अनेक लोकांची हत्या करण्यात आली. अनेक घरं पेटवून देण्यात आली. भडकाऊ भाषण करणाऱ्या अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांच्याविरोधात कोणीही कारवाई करत नाही आहे. नेमकं काय सुरु आहे ? हिंसाचाराची दृश्य पाहून मी प्रचंड बिथरले आहे. फक्त मोजक्या नेत्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पक्षात आपण राहता कामा नये असं मला वाटलं,” असं सांगताना सुभद्रा मुखर्जी यांनी अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांच्यासारखे नेते असणाऱ्या पक्षापासून दूर राहणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “अत्याचार झाल्याने शेजारील देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचा निर्णय खूप चांगला आहे. पण त्याच्या नावाखाली तुम्ही भारतीयांच्या जीवाशी का खेळत आहात. अचानक नागरिकत्व सिद्ध करायला का लागत आहे. मी याचा विरोध करते. ते माणुसकीची हत्या करत आहेत असं मला वाटतं. यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. यामुळे फक्त राजधानी दिल्लीत नाही तर देशभरात अशांतता निर्माण होईल”.