23 November 2017

News Flash

भगतसिंह यांनी ब्रिटीश अधिकाऱ्याला मारलेच नव्हते; लाहोर उच्च न्यायालयात नव्याने खटला चालणार

एफआयआरमध्ये त्यांचे नावच नव्हते

लाहोर | Updated: September 13, 2017 3:21 PM

संग्रहित छायाचित्र

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक भगतसिंह यांना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपात दोषी ठरवत फाशी देण्यात आली होती. मात्र, ते निर्दोष होते असा दावा एका पाकिस्तानी वकिलाने केला असून ८६ वर्षांनंतर भगतसिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा वकील पाकिस्तानातील न्यायालयात लढा देणार आहे. यासंदर्भात त्याने सोमवारी न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे.

भगतसिंग यांचे ‘ते’ ऐतिहासिक पिस्तुल सर्वसामान्यांना पाहता येणार

अॅड. इम्तियाज रशीद कुरेशी असे या पाकिस्तानी वकिलाचे नाव आहे. अॅड. कुरेशी हे सध्या लाहोरमधील भगतसिंह मेमोरिअल फाऊंडेशन चालवतात. कुरेशी यांनी सोमवारी लाहोर उच्च न्यायालयात भगतसिंह यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी नव्याने याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नव्हती.

लाहोर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना विनंती करीत अॅड. कुरेशी यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी विनंती केली होती.

भगतसिंह हे स्वातंत्र्यसैनिक होते भारताचे तुकडे होऊ नये यासाठी ते लढत होते, असे अॅड. कुरेशी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. सरकारचे पुनरावलोकन आणि सुव्यवस्थेचे सिद्धांत वापरून भगतसिंह यांची या आरोपातून सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर भगतसिंह यांचा देशपातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

भगतसिंह यांना ब्रिटिश सरकारच्या काळात २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या २३ व्या वर्षी लाहोर येथील तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यासाठी त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरोधात कट-कारस्थान रचल्याचा आणि भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी मिळून ब्रिटिश अधिकारी जॉन पी. सँडर्स याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अॅड. कुरेशी म्हणाले, याचिकेवर याच महिन्यांत सुनावणी होण्याची आशा आहे. भगतसिंह यांना सुरुवातीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एका बनावट केसमध्ये अडकवून त्यांना मृत्यूदंड देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

२०१४ मध्ये लाहोर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, अनारकली पोलीस स्टेशनमधील १९२८मधील सँडर्स हत्येप्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) शोधून काढला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये या अहवालाची प्रत अॅड. कुरेशी यांना देण्यात आली आहे. हा अहवाल ऊर्दु भाषेत लिहिण्यात आला असून अनारकली पोलीस स्टेशनमध्ये १७ डिसेंबर १९२८ रोजी सायंकाळी ४.३० मिनिटांनी ‘दोन अज्ञात बंदुकधारी’ यांच्याविरोधात याची नोंद आहे. त्यावेळी या गुन्ह्यातील आरोपींवर ३०२, १२०१ आणि १०९ कलमे लावण्यात आली होती. या एफआयआरमध्ये भगतसिंह यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, तरीही त्यांना या हत्येच्या गुन्ह्यामध्ये फासावर लटकवण्यात आले, ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे अॅड. कुरेशी यांनी म्हटले आहे.

First Published on September 13, 2017 2:59 pm

Web Title: bhagat singh did not even kill the british officer the lahore high court will run a fresh case