नवी दिल्ली : औषधे नियामक अधिकाऱ्यांनी आवश्यक परवानग्या दिल्यास भारत बायोटेक कंपनीची करोना प्रतिबंधक लस पुढील वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे.

सध्या कंपनीच्या लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात असून त्या देशातील विविध शहरांमध्ये घेण्यात आल्या. कंपनीच्या कोव्हॅक्सिनची निर्मिती भारतीय वैद्यक संशोधन परिषद व राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. त्यात निष्क्रिय असलेला सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू वापरण्यात आला आहे. हा विषाणू आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत वेगळा करण्यात आला होता.

भारत बायोटेक इंटरनॅशनल या संस्थेचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी सांगितले की, जर आम्हाला योग्य ते परवाने मिळाले तर लस २०२१ मध्ये दुसऱ्या तिमाहीत उपलब्ध होईल. त्यासाठी आधी सुरक्षा माहिती, परिणामकारकता यांचे पुरावे द्यावे लागतील. कंपनीला भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात आल्या असून १३ ते १४ राज्यातील २५ ते ३० ठिकाणी त्या अजूनही सुरू आहेत. त्यात दोन डोस संबंधित स्वयंसेवकांना देण्यात येत आहेत. दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर आहे.

लशीमधील गुंतवणुकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही यात ३५० ते ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी नवीन उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. सरकार व खासगी बाजारपेठ यांना लस पुरवठा करण्याचा आमचा विचार आहे. लशीची किंमत अजून ठरलेली नाही. कारण उत्पादन विकासाची प्रक्रिया अजून सुरू झालेला नाही. सध्या तरी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.