भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी त्यांना ‘रावण’ संबोधण्यास मज्जाव केला आहे. रावणऐवजी चुलबुल पांडे या नावाचा वापर करावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी, चंद्रशेखर आजाद हेच माझं अधिकृत नाव असल्याचं सांगितलं आणि कदाचीत यापुढे मला चुलबुल पांडे या नावानेही ओळखलं जाऊ शकतं असं म्हटलं पण ‘रावण’ नावाचा वापर न करण्याची तंबी त्यांनी दिली.
यापूर्वी चंद्रशेखर आजाद यांना ‘रावण’ या नावाने ओळखले जायचे. आपल्याला अपमानित करण्यासाठीच भाजपाकडून रावण नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे, त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी मतदारांमध्ये रामाचे पाठीराखे आणि रावणाचे पाठीराखे असे म्हणत फूट पाडू नये. माझा कुणीही रावण म्हणून उल्लेख करू नये, मला जर रावण म्हणाल तर कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा चंद्रशेखर यांनी दिला आहे.
चंद्रशेखर आजाद पुढे म्हणाले की, ‘जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण मला ‘रावण’ नावाने ओळखायला लागले. मीडियासह काही लोकांनी मला ‘रावण’ नावाने संबोधण्यास सुरुवात केली आहे. मला हे नाव नकोय. सगळीकडे ‘रावण’ नावाची चर्चा आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष याचा फायदा घेऊ शकतात. मतदरांना राजकीय पक्ष राम आणि ‘रावण’ यांच्यामध्ये एकाची निवड करण्यास सांगू शकतात.’
लोकसभेची आगामी निवडणूक लढविणार नाही. त्याऐवजी भाजपाविरुद्ध विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवारांना पाठिंबा देऊ, असे भीम आर्मीने स्पष्ट केले आहे. राज्यघटना बदलण्याची भाषा करणा-या भाजपाचा पराभव करण्यासाठी देशभरातील दलित आणि मुस्लिम समुदायाने एका झेंड्याखाली यावे, असे आवाहन भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी केले. आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, तसेच लोकसभेची निवडणूकही लढविणार नाही. तथापि, भाजपाविरुद्ध बहुजन समाजाला जागरूक करून संघटित करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.