भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भोपाळमधील व्यापाऱ्यांना भर सभेत खडे बोल सुनावले. तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा तिखट शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सुनावलं. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींच काम असलं तरी तुम्ही सुद्धा यासंदर्भात जागृक राहणं गरजेचे आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांसमोर केलेलं हे भाषण ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही थोडा धक्काच बसला.

प्रज्ञा ठाकूर या भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी मंचावर गेल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच सुनावलं. तुम्ही लोकं आम्हाला मतदान करुन विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. तुम्ही लोकांनाही यासंदर्भात जागृक राहण्याची गरज आहे. मात्र असं होताना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही  यासंदर्भात जागृक नसल्याने विकासकाम होतं नाहीत, अशा शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांचे कान टोचले.

आणखी वाचा- शेतकऱ्याला आलं २६ लाखांचं वीज बिल; वीज विभागाचे अधिकारी म्हणतात…

प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सल्ला देताना तुम्ही जागृक राहणं गरजेचं आहे असं म्हटलं. व्यापारी जागृक असले तर त्यांचा विकासकामांमध्ये जास्त सहभाग असतो, असं मतही प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केलं. अशाप्रकारे प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना थेट सभेमध्ये सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे भर सभेमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. अनेकदा प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्त्यांमुळेच चर्चेत असतात.

न्यू मार्केटमधील व्यवसायिक परिसरामध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री भूपेंद्र सिंह यांनी या परिसराची आपली स्वत:ची एक वेगळी ओळख असल्याचे सांगितले. सध्या राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने आठ महिन्यांमध्ये येथे विकासकामं करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरांचा विकास व्हावा यासाठीच आम्ही धोरणे आखली आहेत. १५ वर्षांपूर्वीचे भोपाळ पाहा आणि आताचे पाहा तुम्हाला लगेच फरक जाणवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशामध्ये स्मार्ट सीटी साकारण्याचं काम सुरु केलं आहे, असंही सिंह यावेळी म्हणाल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.