अमेरिकेत पाच लाख भारतीयांच्या नागरिकत्वाचा मार्ग सुकर

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्यामुळे आता तेथील पाच लाख भारतीय, नोंदणी नसलेले ११ दशलक्ष स्थलांतरित यांच्या अमेरिकी  नागरिकत्वाचा मार्ग खुला  झाला असून किमान ९५००० शरणार्थींना दरवर्षी अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे.

ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कठोर भूमिका घेत  काहींना शरणार्थी छावण्यात दाखल केले होते. त्यात कुटुंबांची मुलाबाळांपासून ताटातूट करण्यात आली होती. शरणार्थीना स्थलांतर विभागाच्या कोठडय़ांमध्ये डांबून ठेवले होते.

अमेरिकेत स्थलांतरित लोक बरेच आहेत. अनेक वर्षे  या स्थलांतरित लोकांनीच अमेरिकेसाठी मोठी कामे केली आहेत, त्यामुळे त्यांना सन्मानाने वागवले जाईल, असे बायडेन यांच्या प्रचार धोरणात म्हटले आहे.  ट्रम्प यांनी मात्र स्थलांतरितांवर कारवाईचा बडगा उगारला होता आणि ते अमेरिकी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आणतात असा आरोप केला होता. आता बायडेन हे अध्यक्ष झाल्याने लगेचच काँग्रेसपुढे स्थलांतर सुधारणा विधेयक सादर केले जाईल.  त्यात कुटुंबांना एकत्र ठेवणे हा उद्देश राहील.

बायडेन प्रशासन कुटुंबाधारित स्थलांतर धोरणाला प्राधान्य देणार असून दरवर्षी किमान ९५ हजार, तर कमाल १ लाख २५ हजार लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला जाईल. त्यामुळे अमेरिकी स्वप्नाची आस (अमेरिकन ड्रीम)  बाळगणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

डेफर्ड अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स म्हणजे ‘डीएसीए’ हे ओबामा यांच्या काळातील स्थलांतर धोरण आता पुन्हा राबवण्यात येईल. ट्रम्प प्रशासनाने  २०१७ मध्येच या धोरणाला पूर्णविराम दिला होता.