चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थती व विविध घटनांमध्ये जवळपास १६ लोकांचा जीव गेला आहे. तर, जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, चीनमधील भयावह पूर परिस्थितीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक मेट्रो ट्रेन पूराच्या पाण्याने भरली आहे आणि प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचले आहे. हा व्हिडिओ हेनानमधील झेंग्झोऊडोंग स्टेशनचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडितो हे देखील दिसत आहे की, लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. एक मेट्रो स्टेशन संपूर्ण पाण्याखाली गेले असून, तेथील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सबवे, हॉटेल्स व सार्वजनिक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी सैन्य कामास लावलं आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून १.२६ कोटी जनसंख्या असलेल्या झेंगझोऊ येथे सार्वजनिक ठिकाणी व सबवे टनल मध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी अशी अतिवृष्टी क्विचतच पाहायला मिळाली असल्याचे म्हटले आहे.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ ने दिलेल्या माहिती नुसार बचाव कार्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ला तैनात करण्यात आलं आहे. कारण, झेंगझोऊ शहरात पूर परिस्थिती अधिक धोकादायक होत चालली आहे.

झेंगझोऊ येथील विमानतळावर येणारी व येथून जाणारी २६० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच, स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी काही रेल्वे देखील थांबवल्या आहेत, काहींच्या वेळांमध्ये बदल केला आहे.