चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘शांतीसंदेश’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना  ‘मन की बात’ सांगितली. स्वच्छ भारत अभियानासह देशात शांतता आणि सद्भावना गरजेची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या जातीय दंगलीमुळे संयुक्ता जनता दल आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाला असतानाच नितीशकुमार यांनी हे विधान केल्याने त्यावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बिहारमध्ये मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे उपस्थित होते. नितीशकुमार म्हणाले, जर १० ते १५ टक्के लोकांनी महात्मा गांधीजींच्या विचारांचे अनुकरण केले तर देशात शांतता प्रस्थापित होईल. सध्याच्या तणाव आणि हिंसेच्या वातावरणात हे अत्यावश्यक आहे. आपण शांतता आणि सद्भावनेचा संदेश दिला पाहिजे. आपण एकेमकांचा आदर केला पाहिजे. त्यामुळेच देश पुढे जाऊ शकतो. तणाव आणि हिंसेमुळे देश पुढे जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

रामनवमीतील हिंसाचारानंतर महत्त्वाचे विधान
रामनवमीनिमित्त आयोजित रॅलीत भागलपूरमध्ये दंगल झाली होती. या हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचे पुत्र अरजित चौबे यांना अटक झाली होती. या घटनेनंतर नितीशकुमार यांनी धर्मनिरपक्षतेबाबत आम्ही तडजोड करणार नाही, असा इशाराच नितीशकुमारांनी दिला.