छप्राजवळ माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या घटनेला एक आठवडा उलटल्यानंतरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ही घटना म्हणजे एक कट असल्याचा संशय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून राजकीय फायदा उठवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने हातमिळवणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा आरोप दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. या घटनेला आठवडा झाल्यानंतरही याप्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवालात विषबाधा झालेल्या शाळेत माध्यान्ह भोजनात कीटकनाशके होती, असे म्हटले आहे. त्यावरून आपल्या संशयाला पुष्टी मिळत असल्याचे नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या खासदार-आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली होती.
छप्रा येथील शाळेत माध्यान्ह भोजनातून विषबाधेच्या घटनेवरून बिहारमध्ये गदारोळ सुरू आहे. नितीशकुमार सरकारच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने टीका सुरूच ठेवली आहे. सरकारने आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर कट आखल्याचा आरोप केला आहे. बोधगया येथे झालेले स्फोट, त्यानंतर माध्यान्ह भोजनातून घडलेल्या घटनेनंतर भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने बंद पुकारले होते. या दोन घटना पाहता या पक्षांचे संधान असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला. सरकार अस्थिर करण्यासाठी अशा घटना आणखी घडू शकतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागरूक राहावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. सत्ता गेल्याने भाजप वैफल्यग्रस्त आहे. त्यामुळे राजदला हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते आपल्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. मात्र लोकांनी जो जनादेश दिला आहे त्या मार्गावरून आपण हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ज्या शाळेत विषबाधेची घटना घडली त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेचा पती राष्ट्रीय जनता दलाचा कार्यकर्ता असल्याचे बिहारचे शिक्षणमंत्री पी. के. शाही यांनी सांगत, यामागे मोठा कट असल्याचे सूचित केले.
स्वपक्षाचाही पाठिंबा : नितीशकुमार यांच्या या आरोपाचे समर्थन संयुक्त जनता दलाच्या सत्यशोधन समितीने केले आहे. या समितीने सरन जिल्ह्य़ातील संबंधित खेडय़ाला भेट दिली. ही घटना म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष बसित नारायण सिंह यांनी केला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी अधिक विद्यार्थी यावेत यासाठी मोफत पुस्तकवाटपाचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप खासदार आरसीपी सिंह यांनी केला. ते या समितीचे एक सदस्य आहेत. राज्य सरकारला बदनाम करणे आणि स्थानिकांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची भावना निर्माण करणे ही दोन कारणे यामागे असल्याचा दावा त्यांनी केला.