बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पुष्पम प्रिया चौधरी हे नाव चर्चेत आहे. पुष्पम प्रिया या द प्लूरल्स पार्टीच्या प्रमुख आहेत. बिहार निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी दोन विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. पाटण्याची बांकीपुर आणि मधुबनीच्या बिस्फी या दोन मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत. पुष्पम प्रिया यांनी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीरात देऊन स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते.

पाटण्याच्या बांकीपुरमध्ये पुष्पम प्रिया यांच्यासमोर शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा आणि भाजपाकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितिन नवीन यांचे आव्हान आहे. नितिन नवीन यांचे वडिल किशोर सिन्हा यांनी सुद्धा बांकीपुरमधून आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. पुष्पम प्रिया जेडीयूचे विधानपरिषदेतील माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे. बांकीपुरमध्ये नितिन नवीन आघाडीवर आहेत. त्याखालोखाल लव सिन्हा दुसऱ्या स्थानावर आहेत.

आणखी वाचा- NDA जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? भाजपा म्हणते…

मधुबनी जिल्ह्याच्या बिस्फी विधानसभा मतदारसंघातूनही पुष्पम प्रिया निवडणूक रिंगणात आहेत. इथून त्यांच्यासमोर आरजेडीच्या फैयाज अहमद आणि भाजपाच्या हरिभूषण ठाकूर यांचे आव्हान आहे. २०१५ मध्ये आरजेडीच्या फैयाज अहमद यांनी सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली होती. आता तिसऱ्यांदा हॅट्रीक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बिस्फीमध्ये फैयाज अहमद आघाडीवर आहेत तर पुष्पम प्रिया तिसऱ्या नंबरवर आहेत.