बिहारच्या छपरा जिल्ह्यातील शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्य़ार्थिनीने शाळेचे मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि शाळेतील अन्य १५ मुलांवर बलात्काराचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. एकूण १८ जणांनी सहा महिने आपल्यावर बलात्कार केला तसेच व्हिडिओ काढून आपल्याला ब्लॅकमेल केले जात होते असा गंभीर आरोप या मुलीने केला आहे.

परसागड गावातील दीपेश्वर बाल ग्यान निकेतन या शाळेत शिकणाऱ्या मुलीने शुक्रवारी पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आले. या मुलीने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि दोन मुलांना अटक केली आहे. पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर २०१७ पासून तिच्यावर अत्याचार सुरु होते. डिसेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा वर्गातल्या एका मुलाने आपल्यावर बलात्कार केला व त्या संपूर्ण प्रसंगाचे मोबाईलवर चित्रीकरण केले.

त्या मुलाने पीडित मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर अन्य पाच विद्यार्थ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी या मुलीने शाळेचे मुख्याध्यापक उदय कुमार उर्फ मुकुंद सिंह यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी आणि अन्य दोन शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला.

छपराचे एसपी हरी किशोर राय यांना या घटनेबद्दल समजल्यानंतर त्यांनी डीएसपी अजय कुमार सिंह आणि महिला पोलीस स्टेशनच्या एसएचओ इंदिरा राणी यांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्याध्यापक, बालाजी नावाचा शिक्षक आणि मोहित-रोहित या दोघांना अटक केली आहे. सादर हॉस्पिटलमध्ये मुलीची वैद्यकीय चाचणी झाली असून लवकरच अहवाल मिळेल. कोर्टापुढे शनिवारी या मुलीची जबानी नोंदवण्यात येणार आहे.