बिहारमध्ये शनिवारी जनता दल संयुक्तच्या नेत्याच्या एसयूव्ही गाडीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला असता एका एकोणीस वर्षांच्या मुलाला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी बिहार विधानपरिषदेच्या आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी यादव याला अटक करण्यात आली आहे. रॉकी यादव हत्या केल्यापासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला मंगळवारी बोधगया येथून अटक केली. रॉकी यादव याला अटक केल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकारी गरिमा मलिक यांनीही दुजोरा दिला आहे.

आदित्य सचदेव(१९) हा मुलगा आपल्या मित्रांसमवेत आपल्या स्वीफ्ट मोटारीतून जात असताना त्याने जनता दल संयुक्तच्या नेत्या मनोरमा देवी यांच्या कुटुंबीयांच्या रेंज रोव्हर गाडीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता. रेंज रोव्हरमध्ये असलेल्या मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी यादव याला या घटनेचा राग आला. तेव्हा रॉकी आणि त्याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. यातील एक गोळी आदित्यला लागली आणि तो जागीच ठार झाला. आदित्यला ज्या बंदुकीतून गोळी मारण्यात आली होती ती बंदुक देखील पोलिसांनी जप्त केली असल्याचे समजते.