मोबाईलचे व्यसन दिवसेंदिवस वाढत असून पोलिसही मोबाईलच्या व्यसनापासून लांब राहू शकलेले नाही असे दिसते. पाटणामध्ये अमली पदार्थाच्या तस्करीसंदर्भात आयोजित एका चर्चासत्रात पोलीस अधिकारी मोबाईलवर कँडीक्रश गेम आणि इंटरनेटवर सर्फिंग करत असल्याचे समोर आहे. बिहारमधील पोलीस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधीत पोलिसांना समुपदेशन करु असे म्हटले आहे.

बिहारमध्ये बुधवारी ‘अमली पदार्थाची तस्करी आणि संघटीत गुन्हेगारी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितिशकुमार हे या परिसंवादातील प्रमुख पाहुणे होते. बिहारचे पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी या परिसंवादात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना दोन पोलीस अधिकारी कँडीक्रश आणि मोबाईलवर सर्फिंग करण्यात व्यस्त होते. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून महत्त्वाच्या विषयावरील परिसंवाद सुरु असताना पोलीस अधिकारी मोबाईलमध्ये कसे रमू शकतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिरिक्त पोलीस संचालक एस के सिंघल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे हे वर्तन अमान्य असून आम्ही त्यांचे समुपदेशन करु असे सिंघल यांनी सांगितले.