अमेरिकेतील चारशे श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्बस्ने जाहीर केली आहे. त्यात सलग २१ व्या वर्षी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे पहिले आले आहेत. त्यांची मालमत्ता ८१ अब्ज आहे. या श्रीमंत व्यक्तींमध्ये पाच भारतीय वंशाचे अमेरिकी लोक आहेत.
‘सिंटेल’ या आउटसोर्सिग आस्थापनेचे संस्थापक भारत देसाई, उद्योजक जॉन कपूर, सिंफनी तंत्रज्ञान संस्थापक रोमेश वधवानी व सिलिकॉन व्हॅली एंजल गुंतवणूकदार कविर्तक राम श्रीराम  व भांडवलदार विनोद खोसला यांचा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश आहे. अमेरिकेतील ४०० श्रीमंत व्यक्तींची सरासरी मालमत्ता ही वर्षांपूर्वी २७० अब्ज अमेरिकी डॉलर होती ती आता २.२९ ट्रिलियन अमेरिकी डॉलर झाली आहे. गेट्स हे सर्वात श्रीमंत अमेरिकी असून त्यांची मालमत्ता ८१ अब्ज आहे. मायक्रोसॉफ्टचे ते अध्यक्ष होते. त्यांचे मित्र वॉरेन बफेट हे बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी असून त्यांचा दुसरा क्रमांक आहे. २००१ पासून ते दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची मालमत्ता ६७ अब्ज डॉलर आहे. लॅरी एलिसन  तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची मालमत्ता ५० अब्ज डॉलर आहे. देसाई व त्यांच्या कुटुंबाचा क्रमांक २५५, कपूर  (२६१), वधवानी (२६४), श्रीराम (३५०), खोसला (३८१) याप्रमाणे क्रमांक लागले आहेत. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग हे अमेरिकेतील ११ वे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या वर्षी त्यांची मालमत्ता १५ अब्ज डॉलर होती, ती आता ३४ अब्ज डॉलर झाली आहे.