बिल गेट्स २३व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर

फोर्ब्स नियतकालिकाच्या अब्जाधीशांच्या यादीत पाच भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यादीतील एकूण ४०० जणांमध्ये मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स लागोपाठ २३व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.

बिल गेट्स व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने लसीकरण व इतर सामाजिक कामात मोठय़ा प्रमाणावर निधी दिला आहे. सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रोमेश वधवानी, सिंटेल भारत या आस्थापनेच्या सहसंस्थापक नीरजा देसाई, एअरलाइन्स कंपनीचे मालक राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर व सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार कविर्तक राम श्रीराम यांचा यादीत समावेश आहे. फोर्ब्स मासिकाने ‘द रिचेस्ट पीपल इन अमेरिका २०१६’ ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात साठ वर्षे वयाचे गेट्स हे ८१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

देसाई यांचा २७४ वा क्रमांक लागला असून, त्यांची संपत्ती अडीच अब्ज डॉलर्स आहे. मिशिगन येथे त्यांनी सिंटेल कंपनीची स्थापना १९८० मध्ये केली होती. तेथे ९५० दशलक्ष डॉलर्सची महसूल निर्मिती होत असून, एकूण २४ हजार कर्मचारी तेथे काम करतात. गंगवाल यांचा ३२१ वा क्रमांक लागला असून, त्यांची संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स आहे. आयआयटी माजी विद्यार्थी असलेल्या गंगवाल यांची इंटरग्लोब एव्हिएशन ही कंपनी आहे. इंडिगो ही त्यांचीच भारतात कमी दरात सेवा देणारी कंपनी आहे. ते या कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

मियामी येथील रहिवासी असलेल्या गंगवाल यांची कंपनीवर ४० टक्के मालकी आहे. जॉन कपूर यांचा ३३५वा क्रमांक लागला असून, त्यांची संपत्ती २.१ अब्ज डॉलर्स आहे. इन्सीज थेरपटिक्स व अकॉर्न या दोन औषध कंपन्यांचे ते अध्यक्ष आहेत. कर्करोगग्रस्तांसाठी ते ओपिऑइड औषधे तयार करतात. सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार कविर्तक राम श्रीराम यांचा ३६१वा क्रमांक लागला असून, त्यांचा निव्वळ महसूल १.९ अब्ज डॉलर्स आहे.  इनमोबी ही मोबाइल जाहिरात कंपनी त्यांनी स्थापन केली आहे.

आयआयटी मुंबईचे वधवानी ६९व्या स्थानावर

वधवानी यांचा ६९वा क्रमांक लागला असून, त्यांची संपत्ती ३ अब्ज डॉलर्स आहे. ते आयआयटी मुंबई व कार्नेगी मेलॉनचे माजी विद्यार्थी व सिंफनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या एकूण १७ कंपन्या असून, त्यांचा वार्षिक महसूल हा २.८ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या वर्षी वधवानी यांनी १ अब्ज डॉलर्सचा निधी भारतातील उद्योजकता प्रोत्साहनासाठी देण्याचे जाहीर केले होते.