समाजाला एका ठेकेदाराची गरज असते, जो त्यांच्या सुख-दुःखांना समजून घेईल आणि त्यादृष्टीने उपाययोजना करेल. आता समाजाला नरेंद्र मोदींच्या रुपात एक नवा ठेकेदार मिळाला आहे असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर बिंदेश्वर पाठक यांनी पुस्तक लिहीले असून या पुस्तकाचे बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. नरेंद्र मोदींचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, नरेंद्र मोदींच्या विचारधारेवर देशातील जनतेला विश्वास आहे. मोदींमध्ये बदल झालेला नाही. मुख्यमंत्री असताना ते जसे होते तसेच ते अजूनही आहेत असे भागवत यांनी सांगितले.

मोदींचे नेतृत्व हे देशासाठी आशेचा किरण आहे. मोदी हे चकमोगिरीपासून चार हात लांब राहिले असे भागवत म्हणालेत. देशाचा विकास महत्त्वाचा असतो. यात तुमचा स्वार्थ बाजूला ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यक्तिमत्व आणि नेतृत्वामुळे जनतेची नजर मोदींकडे आहे. स्वयंसेवक ते पंतप्रधानपदांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास जगभरात चर्चेचा विषय ठरल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले, गेल्या ३ वर्षात १३ हजार गावांमध्ये वीज पुरवण्यात आली. तर मे २०१८ पर्यंत देशात वीज नसलेले एकही गाव नसेल असा दावा त्यांनी केला.