ग्रामीण भागातील जनतेने बदकं पाळण्याला प्राधान्य द्यायला हवे, बदके ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भुमिका बजाऊ शकतात. त्यामुळे बदकांच्या पुरवठा करण्याचा आपला मानस असल्याचे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे त्यांनी असेही म्हटले आहे की, बदके पाण्यात पोहोतात त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. बिप्लव देव हे वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यात आता या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

त्रिपुरातील रुद्रसागर येथे एका पारंपारिक बोट रेसच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथे नीर महाल नामक एका मोठ्या वाड्याभोवती कृत्रित तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवती राहणाऱ्या मासेमाऱ्यांना ५० हजार बदकाची पिल्ले देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण त्रिपुरामधील ग्रामीण भागात पांढऱ्या रंगाची बदकांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ही बदके वितरीत केली जातील त्यामुळे अशा तलावांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहिल तसेच त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदाही होईल, असे देव यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना देव म्हणाले, जेव्हा बदके पाण्यामध्ये पोहतात तेव्हा ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढते. त्यामुळे पाण्यातील माशांना जास्त ऑक्सिजन मिळतो. त्याचबरोबर पक्षांची विष्ठाही ते खात असल्याने पाणी स्वच्छ राहते. त्याचा उपयोग माशांच्या वेगाने वाढीला होतो. हे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने होते.

मात्र, मुख्यमंत्री देव यांच्या ऑक्सिजन वाढीच्या वक्तव्यावर जुक्तीबाद विकास मोर्चाच्या मिहीर लाल रॉय यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांचे हे विधान स्वैर विधान असून यामागे कुठलेही शास्त्रीय कारण नसल्याचे ते म्हणाले. समाजात वैज्ञानिक विचार रुजावेत यासाठी जुक्तीबाग विकाम मोर्चा त्रिपुरात २०१० पासून काम करीत आहे.