सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपला मोठय़ा बहुमताचा अंदाज

नवी दिल्ली : हरयाणामध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मतदानोत्तर चाचणीतून मिळत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दोनतृतीयांश बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एबीपी-सी मतदारनुसार हरयाणात भाजपला ७२ जागा मिळणार असल्याचे तर सीएनएन-आयपीएसओएसनुसार ७५ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.

इंडिया न्यूज-पोलस्टार्टने भाजपला ७५ ते ८० तर काँग्रेसला ९ ते १२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. टाईन्स नाऊने भाजपला ७१ तर काँग्रेसला ११ तर इतरांना ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. एबीपीने काँग्रेसला केवळ ८ तर सीएनने १० जागा मिळतील असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे राज्यातील ९० पैकी भाजपला ६४ तर काँग्रेसला १४ जागा मिळतील असा सर्व मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे.

६५ टक्के मतदान

हरयाणा विधानसभेसाठी ६५  टक्के मतदान झाले. राज्यात ९० जागा असून, भाजपला सत्ता राखण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल मतदारसंघात तुलनेत कमी मतदान झाले. शहरी भागात मतदारांचा प्रतिसाद तुलनेत कमी होता. राज्यात ११६९ उमेदवार रिंगणात होते. मेवत भागात नुह जिल्ह्य़ात दोन गटांमध्ये चकमक झाली. त्यात एक महिला जखमी झाली. मलका गावातील मतदान केंद्राबाहेर सरपंच व माजी सरपंच यांच्या गटात चकमक झाली. या वेळी दोन्ही गटांनी दगडफेक केल्याचे पोलीस अधीक्षक संगीता कलिया यांनी सांगितले. अर्थात मतदानावर त्याचा परिणाम झाला नाही. जेजेपीचे नेते दुष्यंत चौताला यांनी दुमरेखा कलन येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. महिला मतदारांमध्ये उत्साह होता. मुख्यमंत्री खट्टर यांनी जनशताब्दी ट्रेनमधून चंडीगडमधून कर्नाल येथे जाऊन मतदान केले. कर्नाल येथे पोहोचल्यावर सायकलने ते मतदान केंद्रावर गेले. दुष्यंत चौताला ट्रॅक्टरने मतदान केंद्रावर गेले. रोहटकमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांनी कुटुंबासह मतदान केले. मावळत्या विधानसभेत भाजपचे ४८ सदस्य होते.