हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर राजकीय पक्षांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना बलात्काऱ्यांना मृत्यूदंड मिळायलाचं हवा पण तो कायद्याने असं मत व्यक्त केलं आहे. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.

दुसरीकडे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद चकमकीचं समर्थन केलं असून पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे अशी मागणीदेखील केली. समाजासमोर अशी पद्धतीची उदहारणं उभं राहणं गरजेचं असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. तसंच चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली असून, त्यांच्या घरी असाच प्रकार झाला असता तर असं बोलले असते का ? अशी विचारणा केली आहे.

हैदरबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा मध्येही आरोपींना अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता त्यादृष्टीने तपास करत आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच आम्ही सर्व चौकशीला जाण्यास तयार आहोत असंही यावेळी व्ही सी सज्जनार यांनी स्पष्ट केलं. आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.