अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपाने अखेर तंबी दिली आहे. तुम्हाला पक्षाची भूमिका आणि धोरण पटत नसेल तर निघा असे भाजपा नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात सुशील मोदी बोलत होते त्यावेळी त्यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले.

गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा हे भाजपा विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. तसेच १९ जानेवारीला होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीतही आपण हजर राहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. तर मागील महिन्यात शशी थरुर यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही असे वक्तव्य केले होते. मागील दोन महिन्यांपासून शत्रुघ्न सिन्हा हे सातत्याने भाजपाच्या किंवा मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.

काही पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांनाही भाजपा सोडणार का? असा प्रश्न विचारला होता. मात्र मी भाजपा सोडणार नाही असे त्यांनी म्हटले होते. असे असले तरीही त्यांच्या मोदी किंवा भाजपा विरोधी वक्तव्यं थांबलेली नाहीत. त्याचमुळे सुशील मोदींनी त्यांना सुनावले आहे. पटत नसेल तर निघा अशा शब्दात सुशील मोदींनी शत्रुघ्न सिन्हा यांना इशाराच दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा भाजपाबाबत जी काही वक्तव्यं करत आहेत त्याबद्दल एकाही भाजपा नेत्याने आत्तापर्यंत काहीही भूमिका घेतली नव्हती. मात्र आता सुशील मोदी यांनी सिन्हा यांना पटत नसेल पक्ष सोडा असा इशारा दिला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय यावरही टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा असंही म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी एका डेलिसोप मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीला मंत्रीपद देऊ शकतात मग मी काय वाईट होतो? या सगळ्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आता शत्रुघ्न सिन्हा यांना थेट पटत नसेल तर निघा असा इशारा देण्यात आला आहे. यावर शत्रुघ्न सिन्हा काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.