‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तील (एनडीए) शिवसेना, शिरोमणी अकाली दल व अन्य पक्ष भाजपावर नाराज असतानाच ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपा नेतृत्वाने पुढाकार घेतला आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपा नेत्यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार असून हाच पॅटर्न  यापूर्वी राज्यात शिवसेनेसोबत राबवण्यात  आला होता.  आता ही संयुक्त समिती ‘एनडीए’ला तंटामुक्त करेल का, याची उत्सुकता आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. यानंतर आत्मविश्वास वाढल्याने भाजपा नेतृत्वाने ‘एनडीए’तील मित्रपक्षांकडे काहीसे दुर्लक्ष केल्याची भावना शिवसेना, अकाली दल व अन्य पक्षांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून आता शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्येही अकाली दल भाजपावर नाराज आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर दुसऱ्या दिवशी पंजाबमध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल आणि सुखबीर सिंग बादल यांची भेट घेतली.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार पंजाबमध्ये भाजपाने अकाली दलासोबत संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये दोन्ही पक्षांमधील प्रत्येकी तीन नेत्यांचा समावेश असेल. जागावाटप तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा करुन तोडगा काढण्याचे काम ही समिती करणार आहे. पंजाबमध्ये अकाली दल- भाजपामध्ये जागावाटपावरुन वाद आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त ३ जागा तर स्वतःकडे १० जागा ठेवण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. तर भाजपाने जागा वाढवून मागितल्या आहेत. या वादांवर संयुक्त समिती तोडगा काढणार आहे.

महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत भाजपाने एक समिती आधीच स्थापन केली आहे. शिवसेनेसोबत युती तुटणार नाही, असा दावा भाजपा नेते करत आहेत. बिहारमध्येही रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा आणि जनता दल संयुक्तचे नितीशकुमार हे मित्रपक्षातील नेते भाजपावर नाराज आहेत. बिहारमधील मित्रपक्षांसाठी भाजपाने नुकतेच डिनरचे आयोजन केले होते. आगामी काळात अशा स्नेहभोजनचे किंवा समिती स्थापन करण्याचे प्रमाण वाढू शकते, असे तुर्तास दिसते.