केंद्रातील भाजपा सरकार नव्याने कसलीही निर्मिती करु शकत नाही, त्यांना फक्त अनेक दशकांपासून आवडीने आणि कठोर परिश्रमाने तयार केलेलं काम उद्ध्वस्त करता येतं, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे त्याचा भारतीय उद्योजकतेवर कसा परिणाम होईल याबाबत, भारतीय उद्योग क्षेत्रात चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा आहे.
The BJP Government can’t build anything. It can only destroy what was built over decades with passion and hard work. pic.twitter.com/IV0HYE1GJ7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 3, 2019
राहुल गांधी यांनी प्रसिद्ध झालेल्या चार बातम्यांच्या मथळ्यांची कात्रण एक जीआयएफ इमेजद्वारे ट्विटरवरुन शेअर केली आहे. यामध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोचे (एल अँड टी) अध्यक्ष ए. एम. नाईक यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील टिपण्णीचा समावेश आहे, भारतीय रेल्वेचे खासगीकरणाकडे मार्गक्रमण, देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र मंदावले आहे तसेच बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासही पैसा नाही, या मथळ्यांचा यात समावेश आहे.
राहुल गांधी यांच्या या ताज्या टीकेपूर्वी भाजपाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. आपला पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर अडचणीत असताना अध्यक्षपदाचा राजीनामा देत रणांगणातून पळून गेल्याचा आरोप चौहान यांनी राहुल गांधींवर केला होता. तसेच ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला ते निवडणुकीनंतर कुठेच दिसले नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.