23 January 2018

News Flash

शेतकऱ्यांसाठी भाजपची पाच लाख कार्यकर्त्यांची फौज मैदानात

मोहीमेसाठी कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे

नवी दिल्ली | Updated: October 13, 2017 8:22 AM

(प्रतिकात्मक छायाचित्र )

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच शेतकऱ्यांसाठी भाजपने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे सुमारे पाच लाख कार्यकर्ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती या उपक्रमाअंतर्गत दिली जाणार आहे. या मोहीमेसाठी कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी गुरुवारी दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह, कृषी राज्यमंत्री कृष्ण राज, भाजपचे महासचिव मुरलीधर राव, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेंद्र सेनगर आदी मंडळी उपस्थित होती. या बैठकीला भाजपशासित राज्यांच्या कृषीमंत्र्यांनाही निमंत्रण होते. मात्र हरयाणा, झारखंड आणि बिहार वगळता उर्वरित राज्यांच्या कृषीमंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली. उत्तर प्रदेशचे कृषीमंत्री राज्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत व्यस्त होते. तर मध्य प्रदेशचे कृषीमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव बैठकीत अनुपस्थित होते असे समजते.

हिमाचल प्रदेश, गुजरात आणि पुढील वर्षी कर्नाटक या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजी असून याचा फटका निवडणुकीत बसू शकतो अशी भीती पक्षनेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळेच ही बैठक बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी उपस्थितांना विविध कृषी योजनांविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र बऱ्याचदा राजकारण किंवा अन्य कारणांमुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. आता आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी किसान मोर्चाचे सुमारे पाच लाख कार्यकर्ते मोहीम राबवतील, असे मुरलीधर राव यांनी सांगितले. यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांना मदत करण्याचे काम हे कार्यकर्ते करतील, असे सूत्रांनी सांगितले. सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मैदानात उतरुन काम करणेही गरजेचे असते, याकडे पक्षातील एका नेत्याने लक्ष वेधले.

First Published on October 13, 2017 8:22 am

Web Title: bjp kisan morcha to train 5 lakh volunteers to convince farmers narendra modi government radha mohan singh
 1. R
  Ramesh
  Oct 13, 2017 at 6:13 pm
  आधी अर्धवट असलेली कर्जमाफी तरी द्या....नंतर करा हि सर्व जाहिरातबाजी सरकारच्या कामाची....
  Reply
  1. R
   ramdas
   Oct 13, 2017 at 9:19 am
   फुटाणे खाऊन अणुस्फोट घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !
   Reply
   1. N
    nishant
    Oct 13, 2017 at 8:53 am
    मोदींनी शेतकऱ्यांचे ऐकावे...मन कि बात मधून एकतर्फी संवाद करू नये. बार या पाच लाख कार्यकर्त्यांचे तरी मोदी ऐकणार का? कि नेहमीप्रमाणे नुसता हवेत गोळीबार?
    Reply