दिल्लीतील पराभवाबाबत अमित शहा यांची कबुली

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी ‘गोली मारो..’ आणि ‘भारत-पाकिस्तान मॅच’ यांसारखी विधाने टाळायला होती. अशा प्रक्षोभक विधानांचा निवडणुकीत भाजपला फटका बसला असावा, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी व्यक्त केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा आम आदमी पक्षाने धुव्वा उडवला. संपूर्ण ताकद पणाला लावूनही या निवडणुकीत भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या. या पराभवाबाबत अमित शहा यांनी गुरुवारी पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाष्य केले. भाजप नेत्यांनी प्रक्षोभक विधाने करायला नको होती. या विधानांमुळे पक्षाला निवडणुकीत फटका बसला असावा, असे नमूद करतानाच या विधानांना भाजपचे समर्थन नसल्याचे शहा यांनी सांगितले. परंतु, भाजप विजय किंवा पराभवापुरत्या निवडणुका लढवत नाही, तर निवडणुकांच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा विस्तार करण्यावर आमचा विश्वास आहे, असेही शहा म्हणाले.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) देशभरात लागू करण्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, एनआरसी हे भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यातील आश्चासन होते, असे शहा यांनी नमूद केले. राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) अंमलबजावणीवेळी कोणाला कागदपत्रे दाखविण्याची इच्छा नसल्यास त्यांना तशी मुभा आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

‘नागरिकत्व कायद्याबाबत कोणीही चर्चेस यावे’

दिल्ली निवडणुकीचा निकाल हा सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतचा (सीएए) जनादेश नाही, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. या कायद्याचे त्यांनी जोरदार समर्थन केले. या कायद्याशी संबंधित मुद्दय़ांवर माझ्याशी चर्चा करू इच्छिणाऱ्या कुणालाही माझ्या कार्यालयाकडून वेळ मागता येईल. त्याला तीन दिवसांच्या आत वेळ दिला जाईल, असे शहा म्हणाले. मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेण्याची कुठलीही तरतूद नव्या कायद्यात नाही. धर्माच्या आधारे आम्ही कधीच पक्षपात केलेला नाही, असे शहा म्हणाले.