पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात फक्त अंबानी आणि अदानी यांचा विकास होत असल्याची टीका भाजपच्याच आमदाराने केली आहे. ‘मोदींच्या सत्ताकाळात अंबानी आणि अदानी यासारख्या मोजक्या लोकांचा विकास सुरु आहे. शेतकऱ्यांना मात्र मोदींच्या कार्यकाळात त्रास सहन करावा लागतो आहे,’ असे भाजपचे आमदार राजस्थानमधील आमदार घनश्याम तिवारी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिवारी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली, तरीही सामान्य भारतीयांचा विकास मात्र झालेला नाही, अशी टीका घनश्याम तिवारी यांनी केली.

‘शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचतो, त्यालाच लोकशाही म्हणतात, असे दिनदयाळ उपाध्याय म्हणायचेय. मात्र सध्या फक्त अदानी-अंबानी यांच्यासारख्या निवडक व्यक्तींचाच विकास होतो आहे,’ अशी घणाघाती टीका करत भाजप आमदार घनश्याम तिवारी यांनी विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘डोक्यावर कर्ज नाही, असा एकही शेतकरी नाही. शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. दूध उत्पादक दूध रस्त्यावर ओतून देत आहेत. देशातील बेरोजगारी वाढत आहे. देशातील संपत्ती अवघ्या काही लोकांच्या हाती जात आहे. सर्व काही भांडवलशाहांच्या हातात गेले आहे,’ असे म्हणत घनश्याम तिवारी यांनी मोदी सरकारवर थेट शरसंधान साधले. घनश्याम तिवारी भाजपचे सांगनेरचे आमदार आहेत.

मोदी सरकारआधी आमदार घनश्याम तिवारी यांनी राजस्थानातील वसुंधरा राजे यांच्या सरकारवरही तोंडसुख घेतले. राजस्थान विधानसभेने एका प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे राजस्थानच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना सरकारतर्फे बंगला, कार आणि कर्मचारी दिले जाणार आहेत. राजस्थान सरकारकडून मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव जनतेची ‘लूट’ असल्याची टीका घनश्याम तिवारी यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी संबंधित प्रस्ताव अवघ्या पाच तासांमध्ये राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय मंजूर करुन घेतला,’ असेदेखील घनश्याम तिवारी यांनी म्हटले.

‘सिव्हिल लाईन्स येथील बंगला क्रमांक ८ हे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे अधिकृत निवासस्थान आहे. मात्र तरीही त्या बंगला क्रमांक १३ मध्ये वास्तव्यास आहेत. या बंगल्याचे मूल्य २ हजार कोटी रुपये इतके आहेत. राजस्थान सरकारने मंजूर केलेल्या नव्या प्रस्तावामुळे वसुंधरा राजे पुढील निवडणुकीत पराभूत झाल्या, तरीही त्या कोट्यवधी रुपयांच्या घरावर कब्जा करतील,’ असा आरोप घनश्याम तिवारी यांनी केला आहे.