बलिया : बसपच्या प्रमुख मायावती यांना ‘तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट’ असे संबोधणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांच्या वक्तव्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगून पक्षाचे आणखी एक आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोमवारी त्यांचे समर्थन केले.

साधना सिंह जे काही म्हणाल्या, त्यात काहीही चुकीचे नाही. ज्या व्यक्तीला स्वाभिमान नाही, त्याला तृतीयपंथी म्हटले जाते, असे बारिया मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेंद्र सिंह म्हणाले. मायावती यांना १९९५ साली शासकीय विश्रामगृहात मारहाण करण्यात आल्यानंतरही त्यांनी ज्या प्रकारे समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली, त्यावरून त्यांना मुळीच स्वाभिमान नसल्याचे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

साधना सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचा उल्लेख केला असता, असा कसा गुन्हा दाखल होऊ शकतो? आम्ही याविरुद्ध निषेध व्यक्त करू असे सिंह म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथील आमदार असलेल्या साधना सिंह यांनी शनिवारी एका मेळाव्यात बोलताना मायावती यांचे वर्णन ‘महिलांवरील कलंक’ आणि ‘तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट’ असे केले होते. मात्र याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर, कुणालाही दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता असे सांगून क्षमा मागितली होती. १९९५ साली लखनौ येथील विश्रामगृहात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मायावती यांच्यावर हल्ला केल्याच्या कुप्रसिद्ध घटनेचा संदर्भ देताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.

महिला आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याविषयी असभ्य वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस जारी केली असून त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. साधना सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी नेते व मित्र पक्ष यांनी टीका केली आहे. मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी असे म्हटले होते, की मायावती या स्त्री नाहीत व पुरूषही नाहीत, त्या स्त्री जातीला काळिमा असून त्या किन्नरांपेक्षाही हीन आहेत. मायावती यांच्यावर लखनौ येथील अतिथिगृहात १९९५ मध्ये समाजवादी पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला होता तरी त्यांनी  लोकसभा निवडणुकीसाठी त्या  पक्षाशी युती केली त्यामुळे त्यांनी सगळी सभ्यताच विकली आहे. त्यावेळी भाजप नेत्याने त्यांना  वाचवले होते. म्

साधना सिंह यांच्या वक्तव्यावर पाठवलेल्या नोटिशीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या  सचिव बर्नाली शोम यांनी म्हटले आहे,की ‘तुमचे वक्तव्य आक्षेपार्ह,अनैतिक व महिलांचा अवमान करणारे आहे. आयोग या विधानाचा धिक्कार करीत असून जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधाने करणे अशोभनीय आहे. तुम्ही जे विधान केले आहे त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.’