उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अभिनेता कंगना रणौतला झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार बरखास्त करा अशी मागणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे केली आहे. कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगपालिकेडून कारवाई करण्यात आल्यानंतर नंदकिशोर गुर्जर यांनी ही मागणी केली आहे.
हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारसशीनंतर केंद्राकडून वाय-प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील रहिवासी असलेल्या कंगनाला मुंबईत शिवसेनेकडून होणारा विरोध पाहिल्यानंतर ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
कंगनाच्या जीवाला धोका असल्याचे सांगत गुर्जर यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या सूचनेवरून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तीचे ऑफिस पाडले असा आरोप त्यांनी केला आहे.
महानगरपालिकेने बाकीच्या बेकायदेशीर मालमत्तांवर करावाई केलेली नाही परंतु कंगना विरूद्ध कारवाई केली. ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार बरखास्त करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचीही मागणी त्यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ‘पाताल लोक’ या वेब सीरीज विरोधात आमदार गुर्जर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पाकिस्तान आणि विविध इस्लामिक देशांकडून धमकीचे फोन आल्याचे गुर्जर यांनी म्हटंले आहे. महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांचे अंडरवर्ल्डबरोबर असलेल्या संबंधाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. तसेच उद्धव ठाकरे हे ‘डमी’ मुख्यमंत्री आहेत असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.