काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना मंगळवारी ट्विटरवरुन लडाखमध्ये सुरु असणाऱ्या भारत चीन वादासंदर्भात काही प्रश्न विचारले होते. चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये प्रवेश केला आहे का असा प्रश्न राहुल यांनी ट्विटवरुन विचारला होता. मात्र आता या प्रश्नाला लडाखचे भाजपा खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी खोचक शब्दामध्ये ट्विटरवरुनच उत्तर दिलं आहे. “होय चीनने लडाखच्या काही भागांचा ताबा मिळवला आहे,” असं नामग्याल यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे. या ट्विटमध्ये काँग्रेस सत्तेत असताना चीनच्या ताब्यात गेलेल्या प्रदेशाची यादी पाहा असं म्हणत नामग्याल यांनी भारत-चीन सीमेवरील काही ठिकाणांची यादीच ट्विटरवरुन शेअर केली आहे.

अक्साई चीनपासून पैंगनक, जबजी घाट, दूम चेले अशा प्रदेशांची नावं नामग्याल यांनी शेअर करत हे प्रदेश काँग्रेस सत्तेत असतानाच चीनने आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. “माझी अपेक्षा आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस या उत्तराशी सहमत असतील आणि ते पुन्हा या प्रकरणावरुन दिशाभूल करणार नाहीत,” असं नामग्याल यांनी आपल्या ट्विटला कॅप्शन देताना म्हटलं आहे.

काय आहे ट्विटमध्ये

या ट्विटमध्ये नामग्याल यांनी दोन फोटो पोस्ट केले असून एका फोटोमध्ये भारताच्या सीमेजवळ चीनने ताबा मिळवलेल्या प्रदेशांची यादी आणि क्षेत्रफळ देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये या प्रदेशातील कोणत्या जागा चीनने बळकावल्या आहेत याचा अंदाज येण्यासाठी फोटोवरच माहिती शेअर करुन पोस्ट करण्यात आली आहे.

नामग्याल यांनी पोस्ट केलेली यादी खालीलप्रमाणे…

> १९६२ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना अक्साई चीन (३७ हजार २४४ किमोमीटर)

> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना २००८ पर्यंत चुमूरमधील तिया पैंगनक आणि चाबजी घाट (लांबी २५० मीटर) प्रदेश गमावला

> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना २००८ साली चीनी सैन्याने देमजोकमध्ये जोरावर किल्ल्याला उद्धवस्त केलं आणि २०१२ मध्ये पीएलएने तिथे देखरेख करण्यासाठी केंद्र उभारलं. सिमेंटचे बांधकाम असणारी १३ घरांबरोबरच चीनीने येथे न्यू देमजोक कॉलनीची स्थापना केली

> संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना भारताने दुंगटी आणि देमचोकदरम्यानचे दूम चेले (ऐतिहासिक महत्व असलेला व्यापाराचा मार्ग) भारताने गमावला

राहुल यांचा मोदींवर निशाणा

नामग्याल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दुसरे ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “चीनी भारतामध्ये शिरले आणि त्यांनी लडाखमधील आपल्या जमीनीवर ताबा मिळवला. या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी एकदम शांत असून ते कुठेच दिसत नाहीयत,” असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे अनेक बडे नेते भारत-चीन सीमावाद प्रश्नावरुन सरकारला सातत्याने प्रश्न विचारताना दिसत आहेत.

त्या भाषणानंतर नामग्याल चर्चेत

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलल्यानंतर मोदी सरकारने राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात घेतला. त्याबद्दल लोकसभेमधील चर्चेत नामग्याल यांनी दिलेले भाषण चांगलेच गजले होते. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडुण आलेल्या ३४ वर्षीय नामग्याल यांनी आक्रामकपणे केलेल्या भाषणानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केलं होतं.