भाजपाच्या महिला खासदार सावित्रीबाई फुले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे ‘संविधान बचाओ, आरक्षण बचाओ’ रॅलीत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मी खासदार राहू अथवा न राहू, घटनेत बदल करू देणार नाही, असे आव्हानच त्यांनी दिले केंद्र सरकारला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव समावष्टि करण्याच्या निर्णयावरही त्यांनी योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती.

लखनऊमध्ये आज (रविवार) काशीराम स्मृती उद्यानात आयोजित रॅलीत त्या बोलत होत्या. मी भाजपा सरकारविरोधात नाही. मी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोर्चा काढत आहे, असे त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिले. नुकताच अलाहाबाद येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला. आंबेडकरांचा पुतळा तोडला जात आहे. दलितांची हत्या होत आहे. यापेक्षा आंबेडकर आणि घटनेचा जास्त अपमान कोणता असेल?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यापूर्वीही फुले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर टीका केली होती. केंद्राचे धोरण अनुसूचित जाती,जमातीच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. केंद्र सरकार आरक्षण संपवण्याबाबत बोलत आहे. मी त्याच्या विरोधात आहे. आरक्षणावरून मी सरकारच्या विरोधातही जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते.