पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी आपले पुत्र शुभ्रांशू यांच्यासह शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अन्य अनेक नेत्यांनी रॉय पिता-पुत्रांचे पक्षात जोरदार स्वागत केले आहे.

स्वगृही परतल्यानंतर पुन्हा सर्व परिचितांचे चेहरे पाहून आपल्याला आनंद झाला आहे, असे रॉय म्हणाले. रॉय यांना भाजपमध्ये धमकी देण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला आणि त्याचा रॉय यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला, असे ममता बॅनर्जी यांनी रॉय यांच्या पक्षप्रवेशानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भाजप कोणालाही शांततेने जगू देत नाही, सर्वांवर सातत्याने दबाव टाकण्यात येतो, हे मुकुल रॉय यांच्या स्वगृही परतण्यावरून स्पष्ट झाले आहे, असे ममता म्हणाल्या. ममता यांच्या डाव्या बाजूला रॉय बसले होते तर त्यांच्यापुढे अभिषेक हे बसले होते तर पार्थ चॅटर्जी आणि अन्य नेते ममतांच्या उजव्या हाताला बसले होते यावरून तृणमूल काँग्रेसचा भविष्यातील क्रम सूचित होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नारद स्टिंग प्रकरणातआरोप ठेवण्यात आल्यानंतर मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ममतांचे भाचे अभिषेक यांनी रॉय यांच्या पत्नीच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर रॉय स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अभिषेक यांनी रुग्णालयात जाऊन रॉय यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉय यांना तातडीने दूरध्वनी करून पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. रॉय यांनी पक्षाला रामराम करू नये असा मोदींचा हा प्रयत्न होता, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे होते.

आपल्यामध्ये कधीही मतभेद नसल्याचे ममता आणि रॉय या दोघांनीही सांगितले.  जे गेले ते तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा येण्यास तयार असतील तर त्यांचा विचार केला जाईल, असे ममता म्हणाल्या.

पक्षावर परिणाम नाही- दिलीप घोष  

मुकुल रॉय यांनी पक्षाला रामराम केल्याचा संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. तर गटबाजीच्या राजकारणाचा पक्षावर विपरीत परिणाम होत असल्याचे भाजपचे माजी खासदार अनुपम हाझरा यांनी म्हटले आहे.