केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काही गंभीर आरोप केले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे, तसंच जणू काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असं चित्र रंगवलं जात आहे असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान यावेळी प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी कधी तरी लोकांसमोर येतात असा टोला लगावताना प्रकाश जावडेकर यांनी त्यांनी कृषी कायद्यांवर चर्चेसाठी जाहीर आव्हान दिलं आहे. देशातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांवर समाधानी असून पंतप्रधान किसान योजनासारख्या योजनांवरही त्यांचा आक्षेप नसल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

“राहुल गांधी म्हणतात नवे कृषी कायदे रद्द करा. कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की नाही यावर मी त्यांना चर्चेसाठी जाहीर आव्हान देत आहे. राहुल गांधी आणि डीएमकेला मी आव्हान देत आहे,” असं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. प्रकाश जावडेकर यांनी यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांना युपीएच्या तुलनेत एनडीएच्या कार्यकाळात दुप्पट मुलभूत आधार किंमत मिळाल्याचा दावा केला.