गुजरातमधील सहा महापालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपने वर्चस्व कायम राखले. अहमदाबादसह सहा पालिकांतील ५७६ पैकी किमान ४४९ जागा जिंकत भाजपने पुन्हा काँग्रेसचा धुव्वा उडवला.
अहमदाबाद (१९२), राजकोट (७२), जामनगर (६४), भावनगर (५२), बडोदा (७६) आणि सुरत (१२०) महानगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी मंगळवारी झाली. मतमोजणी झालेल्या जागांपैकी ४४९ जागा भाजपने जिंकल्या. त्यातील ४३ जागाच काँग्रेसला जिंकता आल्या.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मतदार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे, असे ट्वीट रूपाणी यांनी केले.
‘आप’ला यश
राज्यातील सहा महापालिकांमध्ये आम आदमी पक्षाने ४७० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सुरतमध्ये २७ जागांवर ‘आप’चा विजय झाला. याच ठिकाणी काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
हा विजय अगदी खास आहे. विकासाच्या राजकारणावर आणि सुशासनावर जनतेचा विश्वास असल्याचे या निकालाने अधोरेखित केले आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:18 am