आघाडीची सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकबाबत प्रकाशित झालेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, तसंच त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ शकतो त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेतली आणि बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला, असा दावा रविवारी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला. त्यावरुन राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य केलं आहे. “भाजपा आणि आरएसएसचं भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”, असा आरोप राहुल गांधींनी केला. यासोबतच एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओही राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केला आहे.

आणखी वाचा- फेसबुकने बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास दिला नकार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

काय म्हटलंय वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये –
जून महिन्यात दिल्लीबाहेर एका चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर बजरंग दलाचा धोकादायक संघटनांमध्ये समावेश करावा अशी मागणी होत होती. वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकच्या एका इंटर्नल रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतातील सत्ताधारी हिंदू राष्ट्रवादी नेते, बजरंग दलावर बंदी घातल्यास फेसबुक कर्मचाऱ्यांवर किंवा कंपनीला मिळणाऱ्या सुविधांवर हल्ला होण्याचा धोका आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. फेसबुकच्या सुरक्षा टीमकडून संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्यानंतरही भारतात अल्पसंख्यांकाविरोधात हिंसेचं समर्थन करणाऱ्या बंजरंग दलाबाबत फेसबुकची नरमाईची भूमिका असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या नव्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर फेसबुकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे. यामध्ये जून महिन्यात नवी दिल्लीत एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ अडीच लाख वेळा पाहिला गेला होता. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्येही फेसबुक भाजपा नेत्यांच्या हेटस्पीच किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचं म्हटलं होतं. त्यात फेसबुकच्या माजी एक्झिक्युटीव्ह अंखी दास यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ऑगस्टमध्ये रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर काही दिवसांनी फेसबुकने संबंधित नेत्याचे खाते बॅन केले होते. मात्र कंपनीवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर अंखी दास यांनी कंपनीला रामराम ठोकला होता.

दुसरीकडे, यावर प्रतिक्रिया देताना, धोकादायक संघटना किंवा व्यक्तीचा टॅग देण्यासाठी आम्ही त्यांची राजकीय ओळख काय आहे किंवा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे असा भेदभाव करत नाहीत, असं म्हणत फेसबुकने एखाद्या राजकीय पक्षासाठी पक्षपातीपणाचे आरोप फेटाळले आहेत.