28 February 2021

News Flash

महात्मा गांधींच्या योगदानाचा सन्मान; साध्वी प्रज्ञा यांची लोकसभेत माफी

मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते, असंही त्या म्हणाल्या.

‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले. ‘विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली’ हे राजा यांनी सभागृहात सांगितले. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत ‘तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये’, असे बजावले. यानंतर सभागृहात गोंधळ झाला होता. तसंच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता. अखेर शुक्रवारी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत लोकसभेत माफी मागितली.

मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असं म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तसंच आपल्यावर न्यायालयात कोणताही गुन्हा अद्याप सिद्ध झाला नाही. तरी मला दहशतवादी म्हटलं जातं. हा एका स्त्री चा अपमान आहे आणि हा एकप्रकारचा अपराध आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणं भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलेच महागात पडलं होतं. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपाने कारवाई केली होती. वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य दुर्देवी असून संसदेत असे वक्तव्य करणे निंदनीय आहे, असं मत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नोंदवलं होतं. समितीतून केलेल्या हकालपट्टीमुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला प्रज्ञा ठाकूर यांना उपस्थित राहता येणार नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 12:33 pm

Web Title: bjp sadhvi pragya apologies in lok sabha mahatma gandhi comment jud 87
Next Stories
1 सफाई कर्मचारी पदासाठी सात हजार इंजिनिअर, पदवीधर तरुणांचे अर्ज
2 हैदराबाद: जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह, सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय
3 हद्द झाली : एक लिटर दुधात पाणी मिसळून दिलं ८१ विद्यार्थ्यांना
Just Now!
X