तामिळनाडू प्रदेश भाजपच्या सरचिटणीसाच्या हत्त्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी तामिळनाडू भाजपने केली असून या हत्त्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व्ही. रमेश (५२) पक्ष कार्यालयातून घरी परतत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री सालेममध्ये त्यांची हत्या केली. मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. राधाकृष्णन यांनी केली आहे. गेल्या वर्षांत अरुण रेड्डी, पी. मुरुगन आणि वेल्लीयन या तीन नेत्यांची हत्या करण्यात आली आणि हल्लेखोरांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.