भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षितता देण्यात यावी, अशी मागणी पक्षाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली. 
पाटण्यातील गांधी मैदानावर मोदी यांच्या सभेवेळी सहा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. एनआयए आणि बिहार पोलीस या स्फोटांचा तपास करीत आहेत. या हल्ल्यानंतर मोदी यांची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे. मात्र, मोदी यांना पंतप्रधानांइतकी सुरक्षितता देण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव भाजपच्या संसदीय मंडळाने बुधवारी मंजूर केला.
मोदी यांच्या जीवितास धोका असतानाही केंद्र सरकार त्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने बघत नाही, असा आरोप पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली.
दरम्यान, मोदी यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.